भाईंदर : ‘वंदे मातरम म्हणायचे आणि नंतर त्याच मातेला धर्माच्या नावावर गुलाम करायचे, अशा वृत्तीपासून सावध राहा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाईंदर येथे केले.
वालचंद हाइट्स या इमारतीमधील भगवान विमल नाथ जैन मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी भाजपवर नामोल्लेख टाळत टीका केली. २५ वर्षांपासून आमच्यासोबत चालणाऱ्या लोकांचे उद्दिष्ट बदलून गेले आहे. मात्र, हे बदललेले उद्दिष्ट हिंदूत्वाला शोभणारे नसल्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली. लोकांना धर्माच्या नावाने गुलाम करून आपल्या कह्यात ठेवण्याचे राजकारण आम्हाला जमत नाही, असे ठाकरे म्हणाले.
शत्रू आपले वडील किंवा गुरू चोरू शकतात. परंतु, आपण जपत असलेले त्यांचे विचार चोरू शकत नाहीत. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, असेही ठाकरे म्हणाले. आपल्या राज्यात गोवंश हत्याबंदी असली तरी बाजूच्या राज्यात मोठय़ा प्रमाणात आईसमान असलेल्या गाईची हत्या करून त्याचे भोजन केले जात आहे. हे कोणते हिंदूत्व आहे, असा सवाल त्यांनी केला.