भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात बांधकामातील टाकाऊ राडारोडा टाकण्यात येत आहे. दिवसेंदिवस प्रमाण वाढत असून या राडारोड्यामुळे रस्ता अडवला जात असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मिरा रोड येथील काशीमिरा भागातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. या मार्गावरील दहिसर टोल नाका ते वर्सोवा पूल या दरम्यानचा परिसर मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत येतो. या महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात बाहेरून आणलेला भराव टाकला जात आहे. या भरावामध्ये मातीसोबत कचरा आणि डेब्रिजचाही समावेश आहे. परिणामी, येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून रस्ता अडवल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

यापूर्वी या महामार्गावर राडारोडा टाकू नये म्हणून महानगरपालिकेने विविध उपाययोजना आखल्या होत्या. त्यामध्ये महामार्गावर अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि कारवाईसाठी स्वतंत्र भरारी पथक स्थापन करणे यांचा समावेश होता. त्यामुळे काही काळ या समस्येत घट झाली होती. मात्र आता पुन्हा ही समस्या डोके वर काढत असून वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्ग प्राधिकरणाकडून तक्रारींकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या बेकायदेशीर भरावावर कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यतः महामार्ग प्राधिकरणाची आहे. मात्र अनेकदा तक्रारी देऊनही संबंधित प्राधिकरण या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. परिणामी, महानगरपालिकेला ही अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागत असून त्यामुळे त्यांच्या कामाच्या ताणातही वाढ झाली असल्याचे माहिती महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.