वसई: नायगाव पूर्वेच्या विविध ठिकाणच्या गावपाड्यातील नागरिकांना रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहतूक कोंडी, प्राथमिक सोयीसुविधा यासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा समस्या सोडवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या समस्यांच्या संदर्भात शनिवारी विचारमंथन बैठक पार पडली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला आहे.

नायगाव पूर्वेच्या भागात जूचंद्र, चंद्रपाडा,  वाकीपाडा, नायगाव, कामण, चिंचोटी, ससूनवघर, मालजीपाडा, बापाणे, टीवरी, राजावळी हे गाव आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग व चिंचोटी कामण रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अर्धवट अवस्थेत असलेले उड्डाणपुलाचे काम, प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव अशा अडचणी निर्माण होत आहे.

याकडे प्रशासन ही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने स्थानिक भूमिपुत्र एकत्रित येऊन यातून तोडगा काढण्यासाठी शनिवारी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या सभागृहात विचारमंथन बैठक घेण्यात आली. यावेळी राजकीय पक्ष बाजूला ठेवत सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक एकत्र आले होते.

यावेळी रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेमुळे सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा मोठा परिणाम येथील दैनंदिन दळणवळणावर होत आहे. शाळेत ये जा करणारे विद्यार्थी सुद्धा वेळेत पोहचत नसल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. तर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यास ही अडचणी येतात. तर प्रवासी वाहतूक करताना रिक्षाचालक ही मेटाकुटीला येत आहेत. मात्र नायगाव पासून ते नागले या दरम्यान येणाऱ्या सर्वच रस्त्यांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर पॅचवर्कचे काम ही निकृष्ट होत आहे. त्याचा हा त्रास सहन करावा लागत आहे. आज अनेक ठिकाणी खाड्या, उघाड्या बुजविण्यात आल्याने पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यातच पुरेशी गटार व्यवस्था ही नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट बनत आहे.

नायगाव पूर्वेच्या रस्त्यावर मॅरेथॉन घ्या

डिसेंबर महिन्यात वसई विरार महापालिकेची राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा होते. पश्चिम पट्ट्यातील रस्त्यावर ही मॅरेथॉन होते. या मॅरेथॉनसाठी महापालिका कोट्यावधी रुपये निधी खर्च करून रस्ते अगदी गुळगुळीत केले जातात. सध्याची रस्त्यांची झालेली अवस्था बघता नायगाव पूर्वेच्या भागातील रस्त्यावरूनही मॅरेथॉनचे मार्ग तयार करा जेणेकरून त्या निमित्ताने तरी रस्ते दुरूस्त होतील असे सामाजिक कार्यकर्ते शेखर भोईर यांनी सांगितले आहे. आम्ही सुद्धा कर भर भरतो मग आमच्याकडे दुर्लक्ष का असा सवालही भोईर यांनी यावेळी केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार

शासन स्तरावर जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचे नेतृत्व करीत असतो. रस्ते व येथील मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे.

जिल्हा प्रशासने सर्व विभागाची संयुक्त बैठक घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असे न झाल्यास थेट कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले जाईल असे भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी सांगितले आहे.