वसई : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातून गुरांना चोरून नेणाऱ्या टोळीचा गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास विरारच्या शिरसाड नाका येथे या टोळीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून त्यात असलेल्या मुक्या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या कडेला व लगच्या गावातील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने जनावरे निवांत बसून असतात. त्याच जनावरांना गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास एक भरधाव कार महामार्गावरील शिरसाड भागातून जात होती.
यावेळी त्या कारची एका वाहनाला धडक लागली. त्या धडकेत ती कार थांबली असताना त्यात दाटीवाटीने कोंबून ४ जनावरे त्यात कोंबून भरली होती. याची माहिती येथील स्थानिकांना मिळताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. या कार मधून एक गाय आणि तीन वासरांना बाहेर काढून चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
अब्दुल वाहिद आणि बिलाल शेख अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. गायीसह वासरांना शिवणसई येथील गोशाळेत नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. यापूर्वी सुद्धा खानिवडे गावातील भरवस्तीतून गुंगीचे इंजेक्शन देऊन कार मधून गुरांना चोरून नेण्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.
गस्त वाढविण्याची मागणी
महामार्ग व आजूबाजूच्या भागातून दिवसेंदिवस जनावरांना चोरून नेण्याच्या घटना वसईत घडत आहेत. यामुळे अधिक प्रभावी उपाय योजना करून महामार्गावरील जनावरांची तस्करी थांबवावी. तसेच मध्यरात्रीपासून ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान गाव खेड्यात पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.