कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : वसइ,  विरार शहरातील कचराभूमीवरील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. गोखिवरे, भोयदापाडा येथील कचराभूमीवर जमा होणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावून येत्या दोन वर्षांत कचराभूमी स्वच्छ करण्यात येणार आहे. यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत ४६ कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे.

वसई पूर्वेतील गोखीवरे येथील भोयदापाडा येथे  ४० एकर जागेत पालिकेची कचराभूमी आहे. याठिकाणी दररोज ७०० ते ८०० टनाहून अधिक कचरा गोळा करून  आणून टाकला जात आहे.   वाढत्या नागरिकरणासोबतच कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे  कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. मिळालेल्या निधीचा वापर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार आहे. येत्या दोन वर्षांत या कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावून कचराभूमी स्वच्छ करण्यात येणार आहे.   कामासाठीचा डीपीआर तयार करण्यात येत असून लवकरच निविदा प्रक्रिया करून या कामाची सुरुवात केली जाणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे यांनी सांगितले.

दुर्गंधी व धुराच्या कोंडमाऱ्यातून सुटका

कचराभूमीवरील कचरा हा प्रक्रियेविनाच पडून असल्याने परिसरात राहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तर  रासायनिक वायू तयार होऊन अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडतात. जर कचराभूमी स्वच्छ झाली तर दुर्गंधी व धुरांच्या कोंडमाऱ्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

नवीन कचराभूमीच्या जागेची अडचण कायम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन कचराभूमी तयार करण्यासाठी २० ते ३० एकर इतक्या जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू  आहेत. मात्र अनेक जागा सीआरझेड, पाणथळ, कांदळवन, खारभूमी अशा क्षेत्रांत येत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. नुकतीच पाचूबंदर येथेही जागा पाहण्यात आली. त्याठिकाणी  प्रकल्प उभारण्यात येणार होता. अडचणी अभावी हे काम पूर्ण झाले नाही, अशी माहिती पालिकेने दिली आहे.