वसई: नैसर्गिक तलाव हे प्रदूषित होऊ नये व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी यावर्षी सुद्धा वसई विरार महापालिकेकडून कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. नऊ प्रभागात ९९ ठिकाणी कृत्रिम तलावांचे नियोजन केले असून फिरते तलाव ही ठेवले जाणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सुद्धा प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलाव उभारण्यासाठी पालिकेने सकारात्मकता दाखवली आहे.

गणेशोत्सव काळात गणेश मूर्त्यांचे विसर्जन हे नदी, तलाव किंवा समुद्राच्या ठिकाणी केले जाते. दिवसेंदिवस गणेश मूर्त्यांची संख्या ही वाढत आहे. या वाढत्या मूर्त्यांच्या संख्येमुळे तलावातील पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. याशिवाय याचा मोठा फटका पाण्यातील जैविक घटकांना बसत असतो.असे प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलाव ही संकल्पना पुढे आली आहे. मागील दोन वर्षांपासून पालिका कृत्रिम तलाव उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावर्षीही प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे.प्रत्येक प्रभागांच्या ठिकाणी पाहणी करून करून प्रभागनिहाय जागा निश्चित केल्या आहेत.  नऊ प्रभागात पालिकेकडून ९९ इतके कृत्रिम तलाव उभारले जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपल्या गणेशमूर्त्या या प्रत्यक्ष तलावात विसर्जित न करता कृत्रिम तलावात करावे जेणेकरून नैसर्गिक तलावाच्या पाण्यातील प्रदूषण रोखण्यास मदत होईल असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

फिरते हौद ही ठेवले जाणार

विविध ठिकाणच्या भागात कृत्रिम तलाव उभारले जाणार आहेत. त्यापाठोपाठ विसर्जनासाठी फिरते हौद ही तयार करण्यात येणार आहेत. यामुळे गणेश भक्तांना आपल्या बाप्पाचे विसर्जन या फिरत्या तयार केलेल्या हौदात करता येईल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी सांगितले आहे.

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर आहे. गणेशोत्सवासाठी पालिकेकडून ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या पुरविल्या जात आहेत.कृत्रिम तलाव निर्मिती यासह अन्य सोयीसुविधांचा समावेश आहे. – दीपक सावंत, अतिरिक्त आयुक्त महापालिका.

मागील वर्षी कृत्रिम तलावाला प्रतिसाद 

मागील वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. त्यावेळी शहरात ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यापैकी १९ हजार ८५३ मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलवात करण्यात आले होते. नंतर त्या मुर्त्या बंद खदाणीत बोअर बेल्ट यंत्राच्या सहाय्याने विसर्जित करण्यात आल्या.

प्रभागनिहाय तलावांची आकडेवारी 

  • प्रभाग ए  –   १२
  • प्रभाग बी- १४
  • प्रभाग सी- १६
  • प्रभाग डी- १०
  • प्रभाग ई- १२
  • प्रभाग एफ- ११
  • प्रभाग जी- ११
  • प्रभाग एच- ७
  • प्रभाग आय- ६
  • एकूण – ९९