विरार : वसईत विरार शहरात मंगळवारी गणपती बरोबर गौराईलाही भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. सहा दिवस अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने निरोप घेतला. संध्याकाळी वसई तालुक्यातील विविध तलावांवर, तालुक्यातील खाडीकिनारी, समुद्रकिनारी तसेच विसर्जनस्थळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशा जयघोषात गौरीं- गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

बाप्पाला निरोप देण्यासाठी वसई-विरार शहरातील अनेक ठिकाणच्या गावतलाव येथे मोठी गर्दी झाली होती. यावर्षी पालिकेने तलावात होणारे प्रदूषण व तलावांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करत व ढोल ताशा, मृदुंगाच्या गजराने सारी वसई विरार नगरी दुमदुमली होती. याशिवाय विसर्जनस्थळी होणाऱ्या सामूहिक आरत्यांनी परिसर दुमदुमून गेला होता. गौरी गणपतींना निरोप देताना भाविक भक्त भारावून गेले होते.

तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व तसेच विसर्जनस्थळी महापालिकेचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान सुरक्षारक्षक म्हणून ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोच्या संख्येने गणेशाच्या मूर्तींचे व गौरींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांनीही चांगले सहकार्य केल्याने वसई विरार शहरात विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत शांततेत पार पडला.

वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी गौरी आणि गणपतीच्या मूर्ती डोक्यावर घेऊन नाचवत, वाजत गाजत विसर्जनासाठी नेण्यात येतात. यावेळीही गणेश भक्तांनी पारंपरिक गीते, टाळ आणि मृदूंगाच्या साथीने नाचत आणि गात मिरवणूका काढल्या होत्या. विरारच्या नवापूर, राजोडी तसेच कळंब परिसरात लहान थोरांसह मिरवणुकींचा उत्साह पाहायला मिळाला.