शासनाकडून पोलिसांना वाहनांचा ताफा

भाईंदर :  मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांना भेडसावत असलेल्या वाहन कमतरतेची अडचण अखेर दूर झाली आहे. गुरुवारी आयुक्तालयाला १४ चारचाकी वाहने आणि १७ दुचाकी देण्यात आल्या. यामुळे पोलिसांना कुठल्याही गुन्ह्य़ाच्या घटनास्थळी तसेच मदतीसाठी अवघ्या पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होईल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.

वाहनांची कमतरता असल्याने पोलिसांना एखादी तक्रार पोलिसांना प्राप्त होताच घटनास्थळी धाव घेण्यास सुमारे २५ ते ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. करोनाकाळामुळे पोलिसांना वाहने मिळण्यास विलंब लागत होता. अखेर जिल्हा नियोजन समितीने ही अडचण दूर केली. गुरुवारी मीरा रोड येथे झालेल्या एका सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही वाहने सुपूर्द करण्यात आली. या पोलिसांना भेडसावणाऱ्या इतर समस्यादेखील लवकरच सोडविल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले.  याप्रसंगी ज्योत्स्ना हसनाळे, आमदार गीता जैन, आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्त दिलीप ढोले उपस्थितीत होते.