भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात अखेर मोफत सुविधा देणारे सीटीस्कॅन यंत्र सुरु करण्यात आले.यामुळे गरजू रुग्णांना उपचारासाठी मोठा याचा फायदा होणार आहे.भाईंदर पश्चिम येथे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आहे. या रुग्णालयाची उभारणी २०१६ साली महापालिकेकडून करण्यात आली होती.परंतु आर्थिक दृष्ट्या हे रुग्णालय चालवणे पालिकेला शक्य नसल्याने २०१९ साली ते राज्य शासनाकडे हस्तांतरित  करण्यात आले.तेव्हा पासून या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी ही राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत पार पडली जात आहे.परंतु शासनाकडून पुरेश्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णालयात तज्ञ डॉक्टर इतर आवश्यक गोष्टीची कमतरता आहे.परिणामी रुग्णालयात मोजक्याच आजारावर उपचार केले जात आहे.

त्यामुळे आता यात वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाकडून पर्यायी मार्गांचा अवलंबन करून यंत्रणा उभारण्याचा पर्याय शोधण्यात आला आहेत.त्यानुसार नुकतीच सिटीस्कॅन यंत्राची उभारणी करण्यात आली आहे. सोमवारी याचे उदघाटन आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.शासकीय रुग्णालयात ही यंत्रणा उभारली असल्याने यापुढे आता मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी आलेल्या रुग्णांना मोफत सीटीस्कॅन करता येणार आहे.

भागीदारीमध्ये यंत्रणा यापूर्वी रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांना ही तपासणी खासगी प्रयोग शाळेत जाऊन करावी लागत होती.यासाठी मोठा खर्च उचलवा लागतो.यावर उपाय म्हणून शासनाने कृष्णा डायग्नोस्टिक लॅबला रुग्णालयात जागा देण्याचे ठरवले आहे.यात खासगी भागीदारी पद्धतीने रुग्णालय सिटीस्कॅन यंत्रनेची उभारणी करण्यात आली आहे.यामुळे रुग्णालयातील दाखल रुग्णांची मोफत तर अन्य रुग्णांना सवलती दरात तपासणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.