भाईंदर : दोन वेळा एमएमआरडीएकडून मंजुरी आणि एकवेळा निधी येऊन परत गेल्यानंतरही मिरा भाईंदरच्या घोडबंदर -जेसलपार्क रस्त्याचे काम सुरु होऊ शकलेले नाही.त्यामुळे शहराला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा निर्णय अधांतरीच राहिला आहे.
मिरा भाईंदर शहराचा विकास हा झपट्याने होत आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे येथील रस्ते हे वाहतुकीसाठी आता अपुरे पडू लागले आहेत.त्यामुळे मिरा भाईंदरच्या मुख्य रस्त्याप्रमाणे शहराला समांतर जोडणारा जेसलपार्क – घोडबंदर हा एक पर्यायी रस्ता उभारण्याचा निर्णय महापालिकेने सात वर्षांपूर्वी घेतला होता.महालिकेच्या विकास आराखड्यात देखील हा रस्ता नमूद असल्यामुळे प्रशासनाने याबाबतची कारवाई सुरु केली होती.महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे साधारण २०१८ साली हे काम एमएमआरडीएमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यावरून एमएमआरडीएने महापालिकेला कामासाठी निधी देखील उपलब्ध करून दिला. परंतु पुढील दोन वर्ष कामात कोणतीही प्रगती न झाल्यामुळे हा निधी परत घेण्यात आला.
त्यानंतर या रस्त्याची उभारणी करण्यात यावी म्हणून २०२२ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एमएमआरडीएला निदेश दिले. त्यावरून एमएमआरडीएने सल्लागार नियुक्त करून या कामाच्या खर्चाचा अहवाल तयार केला.परंतु हे काम करण्यासाठी आता एमएमआरडीएकडे देखील निधी नसल्याने मागील सात वर्षांपासून या रस्त्याच्या उभारणीचे काम रखडले आहे.
एमयुटीपी’मार्फत काम करण्याची मागणी:
मिरा भाईंदर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाहता मुख्य रस्त्या बरोबर पर्यायी रस्ता उभारणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यामुळे घोडबंदर-जेसल पार्क रस्त्याच्या उभारणीचा समावेश मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या महत्वाच्या कामाच्या यादीत करण्यात आला आहे.यात ३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.तर आता एमएमआरडीए कडे असलेल्या कामाचा व्याप पाहता हे काम ‘एमयुटीपी'( मुंबई शहरी परिवहन प्रकल्प) मार्फत करण्यात यावे अशी मागणी आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाकडे केली आहे.
दिरंगाई का?
घोडबंदर -जेसल पार्क हा रस्ता प्रामुख्याने ६० मीटर तसेच काही ठिकाणी ३० मीटर रुंद आहे. या रस्त्याची उभारणी करण्यापूर्वी मिरा भाईंदर महापालिकेला खासगी जागा हस्तांतराची प्रक्रिया करावी लागणार आहे.तसेच यासाठी कांदळवन, वन विभाग आणि इतर महत्वाच्या विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम सुरु असल्यामुळे दिरंगाई होत असल्याची माहिती शहर अभियंता दीपक खांबित यांनी दिली आहे.