विरार : वसई, विरार शहरात गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून त्याचा परिणाम आता लोकल सेवेवरही झाल्याचे दिसून येत आहे. नालासोपारा येथे रुळांवर पाणी साचले असून वसई रेल्वे स्थानकात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विरार आणि वसई दरम्यान असणारी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत.
मंगळवार सकाळपासून वसई विरार शहराला पावसाने झोडपले आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक ठप्प झाली असून त्याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. सकाळपासून विरार रेल्वे स्थानकातून लोकल उशिराने धावत होत्या. दुपारपर्यंत धीम्या गतीने लोकल सेवा सुरु होती मात्र मुसळधार पावसामुळे वसई ते विरार दरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. प्रभागीय रेल्वे व्यवस्थापक मुंबई सेंट्रल, पश्चिम रेल्वे यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून ही माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल दिलगिरीही यात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत लोकल सेवा सुरु होणार नाही असेही यात म्हटले आहे.
मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली असतानाच आता लोकल सेवाही विस्कळीत झाल्याने शहरातील रस्ते आणि रेल्वे प्रवासावर परिणाम होताना दिसत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या सेवा सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.