वसई : मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा वसई विरार शहरात जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणचे सखल भाग पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.

वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू होता. तर मध्येच उन्हाचा ही कडाका असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.

रविवारी पहाटेपासूनच शहरात रिमझिम पाऊस सुरू होता. तर दुपार सत्रात पावसाने उसंत घेतली होती. मात्र सायंकाळी पाच वाजल्यापासून शहरात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील नालासोपारा, नालासोपारा फाटा, गालानगर, अंबावाडी, कॅपिटल मॉल परिसर, विरार, चंदनसार, वसई गाव परिसर, नायगाव पूर्व स्टार सिटी, माणिकपूर, विविध ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा वेग ही मंदावला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अगदी सुरवातीच्या पावसात रस्त्यावर विविध ठिकाणी मोठं मोठे खड्डे तयार झाले असून या खड्ड्यातून वाट चुकवत वाहनचालकांना प्रवास करावा लागला.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे ही चांगलेच हाल झाले. आता शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्याने पालक वर्ग शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले होते. मुसळधार पावसामुळे त्यांना ही ये जा करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे पालकांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा

येत्या पुढील काही तासात पालघर जिल्ह्याच्या विविध ठिकाणच्या भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व विना कारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.