भाईंदर : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दुहेरी मतदार ओळखपत्र तयार करून भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदान केल्याचे आरोप काँग्रेसने केले आहेत. यामध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबियांची नावे दोन मतदार यादींमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

मिरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी केल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या माजी महापौर, माजी नगरसेवक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या संचालकांची नावे दोन मतदार संघांमध्ये असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते दीपक बागरी यांनी गुरुवारी पुराव्यासह सादर केले आहे.

यामध्ये माजी महापौर डिम्पल मेहता आणि त्यांचे पती विनोद मेहता यांच्यासह माजी नगरसेवक संजय थेराडे, कुसुम गुप्ता, रविकांत उपाध्याय आणि संजय सुर्वे आदींची नावे लोकसभा निवडणुकीनंतर १४५ मिरा-भाईंदर आणि १४६ ओवळा-माजिवडा या दोन्ही मतदार संघांमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.यातील काहींनी भाजप उमेदवाराला जिंकण्यासाठी मतदान देखील केले आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान दुबार मतदारांविषयी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याचे बागरी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केली आहे.