वसई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काँग्रेस पक्षाने उपेक्षा केली. डॉ. आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेसने नाही तर नरेंद्र मोदी यांनी दिला असा दावा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी शनिवारी सिंग वसईत आले होते.

वसई विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे-पंडित यांची जाहीर प्रचार सभा शनिवारी संध्याकाळी वसईच्या दिवाणमान येथील मैदानात संपन्न झाली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गुजराथचे गृहमंत्री हर्ष संघवी उपस्थित होते. आपल्या भाषणात सिंह यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संविधानाचा आधार घेत आहेत मात्र ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले त्यांची काँग्रेसने सतत उपेक्षा केली असे ते म्हणाले. डॉ आंबेडकर मुंबईतून निवडणुकीला उभे असताना काँग्रेसने त्यांच्या समोर उमेदवार उभा करून त्यांचा पराभव केला असे ते म्हणाले. काँग्रेस ५२ वर्षे देशात सत्तेवर होती. काँग्रेस बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देऊ शकली असती. पण त्यांना भारतरत्न पुरस्कार काँग्रेसने नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला असा दावा त्यांनी केला. बाबासाहेब देश विदेशात ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या सर्व स्थळांचा पंततीर्थ म्हणून विकास केला असेही सिंह म्हणाले. काँग्रेस अनुसुचित जाती जमातीची जनगणना करण्याची मागणी करत आहे. मात्र कुठल्या जातीला किती आरक्षण देणार हे जाहीर करत नाही. काँग्रेस लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : काँग्रेस नेते मुझफ्फऱ हुसेन यांच्या नावाचे बनावट पत्र; शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. आता मात्र वातावरण बदलत आहे. हरियाणात पूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राज्यातही महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने गरीबी हटवली नाही. परंतु मोदी सरकाने १० वर्षांतच ३ कोटी लोकांना दारिद्ररेषेबाहेर काढले असे ते म्हणाले. २०२७ पर्यंत भारत देश साधनसंपत्तीच्या बाबतीत जगात तिसर्‍या क्रमांकावर असेल असा दावा त्यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीच्या हाती सत्ता देऊन मुंबई आणि महाराष्ट्राला एटीएम बनवू देऊ नका असे आवाहन सिंह यांनी केले. यावेळी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी वसईतील गुंडगिरी मोडून काढण्याचे आवाहन केले.