वसई : तरुणांना दुचाकी जीव की प्राण असते. त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. वसईतील एका तरुणाने दुचाकी दुरूस्त करण्यासाठी पैसे नसल्याने चक्क स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून हा बनाव उघडकीस आणला आहे. वसईच्या फादरवाडी येथे राहणारा अंकीत यादव (२०) हा मुलगा ७ डिसेंबर पासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबिंयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर ८ डिसेंबर रोजी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगा सज्ञान असल्याने पोलिसांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, अंकितचे वडील नन्हेलाल यादव यांना अंकीतने फोन केला आणि तीन अनोळखी इसमांनी अपहरण केल्याचे सांगितले. अपहरकर्त्यांनी अज्ञातस्थळी ठेवले असून खूप मारहाण करत असल्याचे सांगितले.

हेही वाचा : मैत्रकुल संस्थेच्या किशोर जगताप यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नन्हेलाल यादव यांनी तात्काळ वालीव पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेची ४ पथके तयार करून तपास सुरू केला होता. दरम्यान, अंकितच्या व्हॉटसअपवरून त्याच्या वडिलांना एक क्यूआर कोड पाठविण्यात आला होता. त्यावर ३० हजार रुपये पाठविण्यास सांगितले होते. ते न पाठविल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. पंरतु वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने मोबाईल क्रमांक आणि क्यूआर कोडच्या तांत्रिक विश्लेषणावरून शोध लावला. अंकित वालीव येथील एका मित्राच्या घरात लपून बसला होता. पोलीस तपासात त्याने जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला. अंकितच्या दुचाकीच्या दुरूस्तीसाठी ३० हजारांचा खर्च होता. पंरतु त्याचे वडील त्याला पैसे देत नव्हते. त्यामुळे त्याने स्वत:च्या अपहऱणाचा बनाव रचला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता अंकितला समज देऊन सोडून दिले.