वसई/भाईंदर : वसई भाईंदर दरम्यानच्या रो-रो सेवेच्या ‘आरोही’ नावाच्या बोटीत मद्याची मेजवानी (पार्टी) झाल्याचे उघडकिस आले आहे. बोट मालकानेच ठेकेदाराला वाढदिवस मेजवानीसाठी परवानगी दिल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने सांगितले आहे. रोरो सेवेच्या बोटीतील मद्यमेजवानीची चित्रफीत सध्या समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.

रविवारी भाईंदर जेट्टीजवळ उभ्या करण्यात आलेल्या ‘आरोही’ या फेरीबोटीमध्ये काही तरुण मद्यपान करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर पसरली. ‘आरोही’ नावाच्या बोटीत रात्रीच्या सुमारास बसून तरुण जोरात गाणी लावून मद्यपान करत असल्याचे चित्रफीती मध्ये दिसून येत आहे. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करीत सदर रोरो सेवा बोट ही मद्यपार्टीचा अड्डा आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रकारे जर सार्वजनिक सेवेसाठी असलेल्या बोटीत मद्याची मेजवानी केली जात असेल तर रोरो बोटीच्या सुरक्षेचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ लागला आहे.

हेही वाचा : वसई : उपायुक्तांच्या घाऊक बदल्यांचे परिणाम, पालिकेच्या ५ उपायुक्तांवर अतिरिक्त विभागांचा बोजा

मद्यपान करणारे कार्यकर्ते मीरा-भाईंदर भाजपा अध्यक्ष रवि व्यास यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. मात्र रवी व्यास यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. मद्य मेजवानी करणाऱ्यांचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नसून ते माझे कार्यकर्ते नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकार उघडकीस होताच महाराष्ट्र सागरी मंडळांने मात्र सावध भूमिका घेतली आहे. हा प्रकार प्रवासी सेवेदरम्यान घडला नसल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बोट मालकाने त्यांच्या परीचयातील व्यक्तीला वाढदिवस साजरा करण्यासाठी दिली होती. मात्र काही तरुणांनी त्यात मद्याची मेजवानी केली. ही शासनाची बोट नसून ती खासगी आहे त्यामुळे त्याचे प्रवासी काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कसा करावा हा प्रश्न बोट मालकाचा आहे, असे महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणे पडले महागात, तुळींज पोलिसांनी ११ घर मालकांवर दाखल केले गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियम काय सांगतो?

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ७, मनाई कलम २२, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६८(अ) (ब) ८४, ९८, १०३ अन्वये सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे गुन्हा आहे. कलम ८४ अन्वये सार्वजनिक ठिकणी मद्यपान करणारा तसेच कलम ६८ आपली जागा मद्य पिण्यास देणाऱ्यावर गुन्हा दाखल होतो. अशा ठिकाणी गैर वर्तन आणि शिवीगाळ झाली असेल तर कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल होतो.