वसई: रिक्षात सापडलेल्या एका तलवारीमुळे ३ वर्षांपूर्वी झालेली एक हत्या आणि अन्य दोन हत्यांचा कट उघडकीस आला आहे. या सनसनाटी प्रकरणात पेल्हार पोलिसांनी तपास करून ३ आरोपींना अटक केली आहे. बुधवारी पेल्हार पोलीस नियमित तपासणी करत असताना नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथे एका रिक्षात दोन तलवारी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी पोखन साव (५०) याच्यासह दोन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला होता.

पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस निरीक्षक तुकाराम भोपळे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती मिळाली. आरोपी पोखन साव याने २०२१ मध्ये एकाची हत्या करून महामार्गालगत फेकला होता. मात्र तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाल्यामुळे विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि तपास बंद झाला होता. यामुळे पोलीस अधिक खोलात शिरून तपास केला असता आणखी २ हत्येची योजना असल्याचेही उघडकीस आले

हेही वाचा : मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

प्रेमसंबंध आणि तिघांची हत्येची योजना..

याबाबत माहिती देताना परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, आरोपी पोखन साव याचे नालासोपार्‍यात राहणार्‍या गुलशन नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात गुलशनचा पती वकील इद्रीसी (२७) हा अडसर ठरत होता. त्यामुळे पोखन याने दीड लाख रुपये देऊन त्याने अब्दुल शहा उर्फ बड्डा (२३) आणि इम्रान सिद्दीकी (२८) यांच्याबरोबर मिळून इद्रीसी याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या बापाणे गावाच्या हद्दीत टाकून दिला होता. इद्रीसची हत्या केल्यानंतर आपला मार्ग मोकळा असे पोखन याला वाटले होते. परंतु गुलशनचे विक्रम गुप्ता नावाच्या आणखी एका तरुणासोबत संंबंध असल्याचे पोखनला समजले. त्यामुळे त्याने विक्रम गुप्ता आणि गुलशनची देखील हत्या करण्याची योजना बनवली होती.\

हेही वाचा : वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

…म्हणून वाचले दोघांचे जीव

इद्रीसची हत्या करण्यासाठी आरोपी पोखन याने दोन्ही मारेकर्‍यांना प्रत्येकी ३३ हजार रुपये दिले होते. इद्रीसची हत्या पचवल्यानंतर लगेच गुलशन आणि विक्रम गुप्ता याची हत्या करायची योजना होती. परंतु दोन्ही मारेकऱ्यांनी आधी पैसे मागितले आणि त्यावरून वाद झाला. या काळात गुलशन गावी निघून गेली त्यामुळे पोखनची योजना बारगळली आणि गुलशन तसेच तिचा प्रियकर विक्रम गुप्ता या दोघांचे जीव वाचले, असे पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले. आरोपी पोखन साव हा व्याजाने पेसे देण्याचा धंदा करतो. कामानिमित्त त्याचे गुलशन बरोबर प्रेमसंबंध जुळले होते. तिच्यासाठी त्याने इद्रीसची हत्या केली पण गुलशन अन्य व्यक्तीबरोबर लग्न करून गावी निघून गेली. आरोपीला १० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांतर पुढील तपासासाठी विरार पोलिसांकडे हा गुन्हा सुपूर्द केला जाणार आहे.