वसई: वसई विरार  व मीरा भाईंदर शहरातपरदेशातील नागरिक राहण्यासाठी येऊ लागले आहेत. परंतु शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये बहुतांश अशा नागरिकांचा सहभाग आढळून येत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांना भाडेतत्वावर घर देताना त्यांची माहिती पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा मनाई आदेश पोलिसांनी जारी केला आहे.

वसई विरार व मीराभाईंदर शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढू लागले आहे. तर या शहरातील परिसरात स्वस्तात व भाडेतत्वावर घरे उपलब्ध होत असल्याने परदेशातील विविध ठिकाणच्या भागातून येऊन वास्तव्य करीत आहेत. परंतु याची कोणतीच अधिकृत माहिती पोलीस ठाण्याला नाही. त्यातच यातील काही नागरिक गुन्हेगारी, अंमली पदार्थ तस्करी  व विविध प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग आढळून येत आहे.

हेही वाचा >>>वसई : गोदामाची भिंत कोसळून दुर्घटना: ठेकेदाराला अटक, अनधिकृत बांधकामे रोखण्यास पालिका अपयशी

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी वसई- विरार मीरा भाईंदर शहरात १ मार्च पासून २८ एप्रिल पर्यँत  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. याआधी घरमालक पैशाच्या लालसेपोटी परदेशी नागरिकांची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता त्याला भाडेतत्वावर घर देत होता. मात्र आता असे करता येणार नाही. मालकाला परदेशीनागरिकांना घर, दुकाने हॉटेल व जमीन भाड्याने देण्यापूर्वी त्यांची रीतसर भाडे करार करून २४ तासाच्या आत नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती दिल्याशिवाय भाड्याने देवू नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. जे नियमांचे पालन करणार नाहीत अशावर कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.