वसई : सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्री उत्सवाचा जागर सर्वत्र सुरू असल्याने मांगल्याचे वातावरण तयार झाले आहे. या नवरात्रोत्सवानिमित्ताने नायगाव पूर्व जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या प्राचीन चंडिका देवी मंदिरात ही नवरात्री निमित्ताने देवीचा जागर सुरू असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.

वसई तालुक्यातील नायगाव पूर्व भागात जूचंद्र येथील डोंगर माथ्यावर निसर्गरम्य परिसरात चंडिका देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकावर एक दगड रचून दगडाच्या चौथऱ्यावर चंडिका देवी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी देवी, गणपती तसेच दगडात कोरलेल्या वाघाच्या प्रतिमा आहे. हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांच्या अज्ञात वासात त्यांनी या देवींची प्रतिष्ठापना केली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

या पुरातन मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी मंदिरात नवरात्रोत्सवाचे ७१ वे वर्ष असून यानिमित्त मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर पुरातन असल्याने दरवर्षी पालघर, ठाणे आणि मुंबईसह विविध भागातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात अशी माहिती न्यासाच्या विश्वस्तांनी सांगितले आहे.

नवरात्र काळात धूप आरती, महापूजा, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि पालखी सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांसह गरब्याचे आयोजनही श्री चंडिका देवी न्यासातर्फे करण्यात येते. तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहसंमेलन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंदिरात डिजिटल दर्शन व्यवस्थेसाठी दूरदर्शन संच बसविण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतागृह, वाहनतळ व्यवस्था, उद्वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नायगाव पोलिसांकडून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्राचा दर्जा

पुरातन असेलल्या चंडिका देवी मंदिराचा ग्रामस्थांकडून व चंडिका देवी न्यासाकडून नूतनीकरण करण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूने मार्गिका आहेत. पाच वर्षांपूर्वी या मंदिराला जिल्हा प्रशासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पुरातन देवस्थान असल्याने मुंबई, ठाणे, पालघर, मीरा भाईंदर, भिवंडी यासह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून भाविक दर्शनासाठी येत असल्याने गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः नवरात्री आणि यात्रोत्सव काळात अधिक गर्दी होत असल्याचे न्यासाचे विश्वस्त मनोहर पाटील यांनी सांगितले आहे.