भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडा विभागासाठी सर्वसमावेशक नवे धोरण निश्चित करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. क्रीडा संकुलातील तरण तलावात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांचे शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहावे, यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून मैदान, उद्यान, क्रीडा संकुल, तरणतलाव, क्रिकेट व फुटबॉल टर्फ यांची उभारणी केली आहे. या सुविधांचा वापर करणाऱ्यांकडून निश्चित शुल्क आकारले जात असून, त्यातून उत्पन्न मिळवले जाते तसेच देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागवला जातो. मात्र, प्रशासनाने उभारलेल्या या सुविधांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
अलीकडेच, कंत्राटदाराच्या ताब्यात असलेल्या क्रीडा संकुलातील तरण तलावात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात आहे.
या पार्श्वभूमीवर, शहराच्या क्रीडा विभागासाठी सर्वसमावेशक नवे धोरण तयार करण्याचे आदेश आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. क्रीडा क्षेत्रातील सल्लागारांच्या मदतीने हे धोरण निश्चित करण्यात आले असून लवकरच त्याला प्रशासकीय मंजुरी दिली जाणार आहे.
सुरेक्षेला अधिक प्राधान्य :-
महापालिकेची क्रीडा संकुले, टर्फ व इतर सुविधा कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जातात. यापूर्वी या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंना सुरक्षित ठेवण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे अनेक दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.म्हणूनच नव्या धोरणात नागरिकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले असून, त्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पालिका अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली आहे.
नियंत्रण प्रशासनाकडे :-
मिरा-भाईंदर शहरात शासन निधीतून विविध ठिकाणी नव्याने फुटबॉल व क्रिकेट टर्फची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे या टर्फचे संचालन प्रशासनासाठी आव्हान ठरत आहे.या समस्येवर उपाय म्हणून, ठाणे महापालिकेकडून टर्फ संचालनाचे धोरण मागवले आहे. त्यानुसार, हे टर्फ पालिकेच्या नियंत्रणाखालीच चालवण्यात येणार असून, त्याद्वारे मिळणारे उत्पन्न थेट पालिका तिजोरीत जमा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
“क्रीडा विभागाचे काम सुरळीत पद्धतीने पार पडावे म्हणून नवे धोरण निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांना देखील गुणात्मक साहित्य उपलब्ध करून देण्याचे लक्ष आहे.”
राधाबिनोद शर्मा – आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका