भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी काशिमीरा वाहतूक विभागाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील गॅरेज, कार शॉप, स्टॉल, हॉटेल व्यवसायिक, शॉपिंग मॉल आणि दुकानदार यांनी सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतरित्या वाहने उभी करून तसेच साहित्य मांडणी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. सदर दुकाने ही स्थायी स्वरूपाची असल्याने त्यावर ठोस कारवाई करण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत.
रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणाबाबत वारंवार तक्रारी येत असून अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण तातडीने हटवून वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे.
कारवाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
मिरा-भाईंदर शहरात रस्ते आणि पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने काही काळापूर्वी विशेष धोरण निश्चित केले होते.यात प्रभाग अधिकाऱ्यांना थेट कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांनंतर ही कारवाई थांबली असून, प्रशासनाला त्या धोरणाचा विसर पडल्याचे आरोप होत आहेत.तर वेळोवेळी प्रशासनाकडून कारवाई केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आला आहे.