भाईंदर :- मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील काशिमीरा भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांवर अखेर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसर मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
मिरा-भाईंदर शहर फेरीवाल्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहे. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, अंतर्गत रस्ते, मुख्य मार्ग आणि विविध ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले अड्डे मांडले आहेत. त्यातच काशिमीरा येथील उड्डाणपुलाखालील रस्त्याच्या कडेला या फेरीवाल्यांनी दुकाने उभारली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी वाढत होती. परिणामी दहा ते बारा फुटांपर्यंत रस्ता व्यापला जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.
या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. अखेर शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाला पथकाने कारवाई करून परिसर मोकळा केला. या वेळी फेरीवाल्यांनी उभारलेली तात्पुरती दुकाने व जवळपास वीसहून अधिक गाळ्यांवर अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.