भाईंदर : मिरा-भाईंदरमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते दुरुस्त करण्यासाठी तब्बल ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या खर्चास प्रशासकीय मान्यता देत ठराव मंजूर करण्यात आला आहे.
शहरात पावसाच्या आगमनानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच विविध विकासकामांसाठी रस्ते खोदल्यानंतर त्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
नागरिकांनी मागील काही दिवसांपासून रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत समाजमाध्यमांवरून तीव्र टीका केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे अपघात झाल्यास महापालिकेला भरपाई, वैद्यकीय खर्च व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून रस्त्यांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी २०२२-२३ मध्ये प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसाठी ५० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केली होती. त्या तरतुदीनुसार यंदाही रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च पूर्ण करण्याबाबतचा प्रशासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे.यात एक वर्षासाठी कंत्राटदाराची निवड करण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
..तर दंड आकारणार
मिरा भाईंदर शहरात शासकीय कामासोबत काही खाजगी विकास कामाचा फटका देखील रस्त्याना बसत आहे.यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन ते खचू लागले. परिणामी असे रस्ते दुरुस्त करत असताना प्रशासनाचा मोठा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे यापुढे खासगी कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाल्यास संबंधित संस्थेकडून रस्ते दुरुस्तीचा खर्च वसुल करण्यासाठी दंड आकरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे
