भाईंदर :-मिरा भाईंदर मेट्रो प्रकल्प ९ च्या मार्गीकेमध्ये जिन्यासाठी बाधित होणाऱ्या भाजप आमदाराच्या १३३ मीटर जागेला सोळाशे मीटर दाखवून कोट्यावधी रुपये भु- संपादन करण्याचा घाट शासनाकडून केला जात असल्याचे आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.

मिरा भाईंदर मेट्रो मार्गीका ९ अंतर्गत येत असलेल्या काशीगाव मेट्रो स्थानकासाठी उभारण्यात येणाऱ्या जिन्याच्या बांधकामासाठी लागणारी जागा ‘सेवेन इलेव्हेन’ या आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या मालकीची आहे.ही जागा महापालिकेच्या विकास आराखड्यात सेवा रोडसाठी आरक्षित असून, २०२२ मध्ये महापालिकेने विकास हक्क प्रमाणपत्राच्या आधारे ही जागा ताब्यात घेण्याची मागणी केली होती. मात्र, कंपनीने त्यास सहमती न दर्शवता चालू बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली, ज्यामुळे महापालिकेवर सुमारे २३ ते ३० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

या वादामुळे एमएमआरडीएने स्थानकाच्या आराखड्यात बदल करून जिन्याचे स्थान जवळील नाल्यावर हलवले होते. परंतु, कंपनीने ही नाल्यावरील १३३ मीटर जागाही आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथे सुरू असलेले काम मागील वर्षभरापासू थांबवले आहे.

त्यामुळे जिन्यासाठी बाधित होणारी जागा ताब्यात घेण्यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने मेहता यांच्या कंपनीला विकास हक्क प्रमाणपत्र देण्याची तक्रारी देऊ केली होती.मात्र यास कंपनीने नकार देत बाजारभावाप्रमाणे थेट रोख रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या जागेचे भु- संपदान करण्यासाठी महापालिकेच्या नगरविकास विभागाने ३ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्हा धिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला आहे. यामध्ये १३३ मीटर ऐवजी थेट २६०० मीटर इतकी जागा घेण्याचे निश्चित केले आहे. यामुळे आमदाराला मोबदला स्वरूपात कोट्यावधी रुपयांचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबतची चौकशी करून हा व्यवहार रद्द करावा, अशी मागणी मिरा भाईंदर युवक काँग्रेस पदाधिकारी रवि खरात यांनी केली आहे.तर सदर रस्ता हा मागील सत्तर वर्षांपासून अस्तित्वात आहे.मागील काही वर्षात रस्त्यावर पालिकेमार्फत अनेक विकास कामे देखील झाली आहे. मात्र २०१० ही जागा खरेदी केल्यानंतर आता आमदारांसाठी या जागेचे भु-संपादन करण्यावर कोट्यावधी रुपये खर्च करणे म्हणजे थेट भ्रष्टाचार करण्यासारखे असल्याचे आरोप काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.