भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांचा फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आयुक्तांना शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
मिरा भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी शहरात विशेष शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे फोटो प्रताप सरनाईक यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये आयुक्त राधा बिनोद शर्मा भाषण करत असतानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. या छायाचित्रामध्ये आयुक्तांच्या मागे शिवसेनेचे चिन्ह दिसत असल्याने हे राजकीय व्यासपीठ असल्याचा भास होत आहे.
दरम्यान, हाच फोटो भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील आपल्या समाजमाध्यम खात्यावर टाकला आहे आणि त्यात आयुक्त शर्मा यांना शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. खुद्द मेहता यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून या शुभेच्छा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून आमदार नरेंद्र मेहता हे महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. शर्मा हे आपली जबाबदारी नीट पार पाडत नसल्याचा आरोप मेहता यांनी वारंवार सार्वजनिकरीत्या केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टमुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या प्रकरणी अद्यापही आमदार नरेंद्र मेहता यतसेच आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.