भाईंदर : प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी दंड भरू न शकलेल्या एका औषध दुकानदाराचा फ्रीज महापालिकेच्या सफाई पथकाने उचलून नेल्याची घटना मिरा रोड येथे घडली आहे. हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून समाजमाध्यमांवर झपाट्याने व्हायरल होत आहे.
मिरा भाईंदर शहरातील स्वच्छतेत भर घालावी आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर आळा बसावा यासाठी महापालिकेने प्रभाग स्तरावर विशेष स्वच्छता पथक तयार केले आहे. या पथकाला पावती पुस्तिका आणि विशेष गणवेश प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार हे पथक प्रभागातील विविध भागात जाऊन रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करते. तसेच प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांकडून दंड वसूल करण्याचे अधिकारही प्रशासनाने या पथकाला दिले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रभाग क्रमांक ६ मधील एक पथक काशिमीरा येथील औषध दुकानात गेले. यावेळी दुकानदाराकडे प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यावरून पथकाने दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे दुकानदाराने तत्काळ दंड भरू शकत नसल्याचे पथकाला सांगितले. यावरून दुकानदार व पथक यांच्यात काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यानंतर दंडाची रक्कम मिळत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या पथकातील एका कर्मचाऱ्याने थेट दुकानदाराचा चॉकलेट व इतर साहित्य ठेवलेला फ्रीज उचलण्यास सुरुवात केली. याला इतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले आणि अखेर फ्रीज दुकानाबाहेर काढण्यात आला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दुकानदार रामसिंग धनिया यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले असून संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी भाजप नेते रवि व्यास यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. तर या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.