भाईंदर :- रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणाऱ्या तबेलेधारकांवर महापालिका प्रशासनाने अखेर सक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोन तबेलेधारकांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
मिरा-भाईंदर शहरात सध्या सुमारे पाचशेपेक्षा अधिक जनावरे मोकाट फिरताना दिसून येतात. ही जनावरे काही खासगी तबेलेधारकांची असून, ते त्यांच्या जनावरांची योग्य देखभाल करत नाहीत. परिणामी ही जनावरे शहरात मुक्तपणे फिरताना दिसतात. अनेक वेळा ही जनावरे रस्त्याच्या मध्येच बसत असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच, रस्त्यांवर शेण पसरल्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. याशिवाय ही जनावरे कोणत्याही क्षणी अंगावर येतील, अशी भीतीही नागरिकांमध्ये आहे.
महापालिकेचे धोरण मोकाट जनावरांवर निर्बंध घालण्याचे असले तरी प्रत्यक्षात त्यावर प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. या संदर्भात तक्रारी वाढू लागल्यानंतर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाला दिल्या होत्या.
त्यानुसार भाईंदर भागात फिरणाऱ्या जवळपास दहा गायींना प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. तसेच उषा यादव आणि भरती खडका या तबेलेधारक महिलांवर प्राणी छळ प्रतिबंधक आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २७०, २७१, २७७ आणि २९२ अंतर्गत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे.