भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना लस देण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून कोंबून प्रवास घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींना एचपीवी लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लसीमुळे भविष्यात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव होणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षण विभागाला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाचे सहकार्य मिळत आहे. त्यानुसार महापालिकेच्या शाळांजवळील आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे.
दरम्यान, गुरुवारी काशिमीरा येथील शाळा क्रमांक १९ मधील ९० विद्यार्थिनींसाठी लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही लस काशिमीरा येथील शाळा क्रमांक ५ जवळ असलेल्या आरोग्य केंद्रात दिली जात होती. या दोन शाळांमधील अंतर मोठे असल्यामुळे विद्यार्थिनींना वाहनाची गरज होती. मात्र महापालिकेची परिवहन बस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने विद्यार्थिनींना चक्क रुग्णवाहिकेतून ने-आण केली.
धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णवाहिकेच्या फेऱ्या अधिक पडू नये म्हणून विद्यार्थिनींना कोंबून भरले गेले होते.इतकेच नव्हे, तर प्रवास जलद व्हावा म्हणून चालकाला रुग्णवाहिकेचे सायरन वाजवण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र आरोग्य केंद्राजवळ येताच रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनी उतरत असल्याचे लक्षात येताच संशय निर्माण झाला.
मनसे शहर सचिव सचिन यांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. हे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. तर विद्यार्थिनींना रुग्णवाहिकेतून आणण्याचा निर्णय घेणाऱ्या जबाबदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.