भाईंदर : मिरा रोड येथे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बदलून नव्याने महापालिकेकडून नाल्याची उभारणी केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला असून काम रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मिरा रोड येथील शांतीवन भागात अनेक वर्षांपासून नैसर्गिक नाला वाहत होता. यामुळे अतिवृष्टी झाल्यानंतरही पाणी साचण्याची समस्या उभी राहत नाही. मात्र काही दिवसापूर्वी महापालिका प्रशासनाने या नाल्याचा प्रवाह बदलून त्यावर नाल्याच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. परंतु यावर स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

या संदर्भात स्थानिक गृह संकुलानी महापालिकेकडे लेखी तक्रार दिली असून त्यात केलेल्या आरोपानुसार महापालिका प्रशासनाकडून अरुंद रस्त्यावर नाले उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे भविष्यात हा रस्ता अपुरा पडणार आहे. तसेच नाल्याचा मुख्य प्रवाह बदलण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच आवश्यकता नसताना देखील नाले उभारणीच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च केला जात असल्यामुळे ते काम तात्काळ बंद करण्याची मागणी देखील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

३५ झाडांची कत्तल केल्याचा आरोप: नव्याने नाले उभारण्याचे काम हाती घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने एकाच रात्री जवळपास ३५ झाडे तोडल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.याबाबत पर्यावरण प्रेमी देखील एकटवले असून प्रशासनाला स्थळ पाहणी करून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

आमदारांचाही कामावर आक्षेप: नाल्याच्या कामासाठी झाडे कापण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी या कामास विरोध करण्यास सुरुवात केली आहे.त्यावरून मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील या कामाची पाहणी केली. यावर एका मंत्र्यांच्या खासगी जागेतून हा नाला वाहत असल्यामुळे त्याचा मार्ग बदलण्यात आल्याचे आरोप त्यांनी केला.तसेच विनाकारण झाडे कापणे व इतका खर्च होत असल्यामुळे हे काम तात्काळ थांबवणार असल्याची माहिती मेहता यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महापालिकेमार्फत केली जाणारी कामे ही सर्व प्रक्रिया पार पाडून केली जातात.त्यामुळे एखाद्या कामाची कोणतीही तक्रार असेल तर त्याबाबत स्थळ पाहणी करून योग्य निर्णय घेतला जाईल” – राधा बिनोद शर्मा- आयुक्त ( मिरा भाईंदर महानगरपालिका)