भाईंदर : मिरा रोड येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात कबुतरांना दाणे टाकण्यावरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये ६९ वर्षीय वयोवृद्ध पिता आणि त्यांची मुलगी यांना मारहाण करण्यात आली असून, काशिमीरा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड येथील डीबी ओझोनमधील इमारत क्रमांक ३० मध्ये राहणारे महेंद्र पटेल हे रविवारी सकाळी दूध आणण्यासाठी इमारतीच्या खाली गेले होते. त्यावेळी शेजारील इमारत क्रमांक २९ मध्ये राहणाऱ्या आशा व्यास (वय ५६) या सार्वजनिक परिसरात कबुतरांना दाणे टाकत होत्या. महेंद्र पटेल (६९) यांनी त्यांना दाणे टाकू नका, असे सांगितल्याने आशा व्यास यांनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली.

गोंधळ ऐकून पटेल यांच्या मुलगी प्रेमल (वय ४६) या खाली आल्या. वडिलांना शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर आशा व्यास यांनी प्रेमल यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री दोन अनोळखी व्यक्तींना सोबत घेऊन तेथे आला. त्याने प्रेमल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तर दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्याचा चावा घेतला आणि हाताने मारहाण केली.

या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी घातल्याच्या प्रकरणानंतर आता नागरिकांमध्ये देखील वाद घडत असल्याचे समोर आले आहे.