भाईंदर: मिरा रोड रेल्वे स्थानकावर गर्दूल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मिरा रोड स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, याच सुविधांचा गैरफायदा घेत नशेखोरांचा वावर स्थानक परिसरात वाढला आहे. हे गर्दूल्ले दिवसा व रात्री नशेच्या अवस्थेत स्थानकावरच झोपलेले किंवा अड्डा जमवलेले दिसून येतात.
या स्थानकावर महिला, वृद्ध आणि विद्यार्थी दररोज प्रवास करतात. मात्र, रात्रीच्या वेळेस नशेखोरांच्या उपस्थितीमुळे महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रेल्वे पोलीस व प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.
साहित्य गायब ?
मिरा रोड रेल्वे स्थानकावर प्रशासनाकडून अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत सुरक्षा जाळ्या, कचऱ्या कुंड्या आणि इतर वस्तूंचे साहित्य गायब होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गर्दूल्ल्यांकडूनच हे साहित्य चोरी होत असल्याचा दाट संशय प्रवाशांमध्ये व्यक्त केला जात आहे.
कारवाई केली जात असल्याचा दावा
रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हे पोलीस स्थानकावर विनाकारण वावरणाऱ्यांची विचारपूस करून त्यांना स्थानकाबाहेर पाठवतात. तसेच, गरजू किंवा बेघर व्यक्ती आढळल्यास, याबाबतची माहिती महापालिकेला तसेच सामाजिक संस्था चालवणाऱ्यांना देण्यात येते आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येते, अशी माहिती स्थानकावरील एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिली.