भाईंदर: मिरा भाईंदर शहरात मेट्रो कारशेडच्या कामासाठी पहिल्या तब्येत चौदाशे झाडे तोडण्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएला ७ कोटीची शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा खर्च २० कोटीच्या घरात असल्यामुळे एमएमआरडीएकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता.
मेट्रो प्रकल्प क्रमांक ९ अंतर्गत, भाईंदरच्या डोंगरी भागात कारशेड उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी बांधकाम परवानगीदेखील देण्यात आली आहे. मात्र, या कारशेडसाठी एमएमआरडीएने ११,३०६ झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे.पहिल्या टप्प्यातील १४०६ झाडे काढण्याची व पुनर्रोपण करण्याची परवानगी देताना महापालिकेने २० कोटी ७३ लाख रुपयांचे शुल्क भरण्यास एमएमारडीएला सांगितले.
१४०६ वृक्षांपैकी ८३२ झाडे मुळासहित काढली जाणार आहेत, तर ५७४ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. मुळासहित काढण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात ८२९२ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतीझाड २५ हजार रुपये याप्रमाणे २० कोटी ७३ लाख रुपये महापालिकेकडून आकारण्यात आले, परंतु महापालिकेने आकारलेल्या शुल्कावर एमएमआरडीएकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
२५ हजार प्रती झाड हे शुल्क खूपच जास्त आहे. एमएमआरडीए ठाणे व कल्याण डोंबिवली परिसरातही प्रकल्प राबवत असून, त्यांचे दर अत्यंत वाजवी व रास्त आहेत. त्यामुळे हे दर कमी करण्यात यावेत, असे पत्र एमएमआरडीएने मिरा-भाईंदर महापालिकेला देण्यात आले. त्यावरून आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी हे दर कमी करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार ८,२९२ नवीन लागवड करण्यात येत असलेल्या झाडांच्या शुल्कात महापालिकेने मोठी कपात केली आहे. त्यामुळे या लागवडीसाठी आता एमएमआरडीएला सहा कोटी ७१ लाख रुपये तसेच वृक्षतोड व पूनर्रोपणासाठी चार लाख २१ हजार असे सात कोटी ४९ लाख रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दहा हजार झाडांचा प्रश्न कायम
मेट्रो कारशेडसाठी दुसऱ्या टप्प्यात ९९०० झाडांची तोड तसेच पुनर्रोपण केले जाणार आहे.मात्र यास पर्यावरण प्रेमींनी कडाकून विरोध केला आहे.त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासन सुनावणी प्रक्रिया घेऊन आंदोलन करायची मागणी शासनापर्यंत पोचवली आहे. मात्र यावर अजूनही ठोस निर्णय न झाल्यामुळे संपूर्ण काम रखडले आहे.