भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये आज (८ जुलै )निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चापूर्वीच, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. यापूर्वीच त्यांना शहरात उपस्थित राहू नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर शहरात सध्या मराठी भाषेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे कार्यकर्त्याकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर त्या हिंसेच्या निषेधार्थ २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप झाला. त्याविरोधात मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा मनसेने केली होती. त्या अनुषंगाने ८ जुलै रोजी मोर्चा आयोजित करण्यात आला असून, त्याला विविध पक्षांचे मराठी नेते व संघटनांचा पाठींबा मिळाला आहे.
दरम्यान, मोर्चाची तयारी सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव व शहर प्रमुख संदीप राणे यांना एक दिवस शहरात येण्यास मनाई करण्याचा आदेश दिला होता. मात्र, पोलिसांचा आदेश मान्य नसल्याचे स्पष्ट करून जाधव यांनी मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याची घोषणा केली होती.
या पार्श्वभूमीवर, मोर्चापूर्वी मध्यरात्री काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांनी जाधव यांना ताब्यात घेतले. तसेच शहरातील अन्य मनसे पदाधिकारी व मराठी एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
वसईतील मनसे कार्यकर्ते ही ताब्यात
मिरा भाईंदर मध्ये मनसेकडून मराठी मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्च्यात मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते व मराठी भाषिक नागरिक सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोर्चा निघण्यापूर्वीच वसईतील मनसेचे जयेंद्र पाटील, प्रफुल्ल पाटील यासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.