वसई: नालासोपारा येथील अमली पदार्थ प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना निलंबित करण्यात आले असतानाच दुसरीकडे ६ पोलीस निरीक्षकांच्या सुद्धा तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीसांनी नालासोपारा येथे अमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
असे असतानाच सोमवारी ६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रमुख सचिन कांबळे यांची पेल्हार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद देण्यात आले आहे. तर मांडवी पोलीस ठाण्याचे संजय हजारे यांना नायगाव पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. यासह नायगाव पोलीस ठाण्याच्या विजय कदम यांना नायगाव पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक पद, पेल्हार पोलीस ठाण्याच्या दिलीप राख यांना काशीमिरा पोलीस ठाण्यात नियुक्त केले आहे.
तर काशिमिरा पोलीस ठाण्याचे रणजित आंधळे यांना मांडवी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद आणि महिला अत्याचार कक्षाच्या सौरभी पवार यांची काशिमीरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी काढले आहेत.
