विरार : नालासोपाऱ्यात सातत्याने अमली पदार्थ तस्करी होण्याच्या घटना समोर येत आहेत. पुन्हा एकदा प्रगतीनगर परिसरातून २ कोटी ८ लाख किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.

नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहे. यातील अनेक नागरिक अमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे उघड होऊ लागले आहे. नालासोपाऱ्यातील प्रगती नगर परिसरात जग्गनाथ अपार्टमेंट येथील सदनिकेत एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून सापळा रचला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून १ किलो ४० ग्रॅम वजनाचा मॅथेड्रोन (एमडी), नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. याची किंमत २ कोटी ८ लाख रुपये इतकी आहे. तर रोख ३४ हजारांची रोख रक्कम ही जप्त केली आहे.

यात चिमेझी इमॅन्युएल गॉडसन चिमा (४०) या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (क), पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम १२, सह विदेशी व्यक्ती अधि. १९४६ चे कलम १४ सह पारपत्र अधि. १९२० चे कलम ३ (अ), ६ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक आंनद पेडणेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड आदींच्या पथकाने केली.

कारवाईत अडथळे

या प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले. यामुळे शहरातील नायजेरियन नागरिकांकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी, त्यांचे बेकायदा वास्तव्य आणि यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.