भाईंदर : भाईंदर पश्चिम येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा खोदकाम करून रस्ता खोदण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
भाईंदर पश्चिम येथील माहेश्वरी भवन परिसरात सुमारे ३० मीटर रुंद सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू होते. काही आठवड्यांपूर्वीच हे काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांतच या नव्या रस्त्याचे पुन्हा खोदकाम करण्यात आल्याचे दिसून आले आहे.सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे आयुष्य तुलनेने अधिक असल्याने त्यांच्यावर मोठा खर्च केला जातो. त्यामुळे नव्यानेच तयार झालेला रस्ता पुन्हा खोदण्यात आल्याने हा एकप्रकारे शासकीय निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर रस्ता जलवाहिनी अंथरण्यासाठी खोदण्यात आला आहे.
मात्र जी काम आहेत त्या कामांचे पूर्व नियोजन करून जर केली असती तर पुन्हा हा रस्ता खोदण्याची वेळ आली नसती. असे पूर्व नियोजन नसल्यानेच नवीन रस्ते खोदले जातात त्यामुळे अशा रस्त्यांची लवकर दुरावस्था होते असे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
कारण अस्पष्टच
या रस्त्याच्या कामाची जबाबदारी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येते. याबाबत विचारले असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुकणे यांनी, “हे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात आले असून महापालिकेला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही,” असे सांगितले.दरम्यान, या खोदकामासंदर्भात एमएमआरडीएकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही.
कारवाईची मागणी
या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील समन्वय अभावामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होतो आहे, असा आरोप करत भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी ठोस यंत्रणा तयार करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.