वसई: वसई विरार मधील नवापूर, राजोडी व अर्नाळा या समुद्रकिनाऱ्यावर मागील दोन दिवसांपासून तेलाचे तवंग दिसून आले आहेत. त्यामुळे समुद्रातील पाणी प्रदूषित झाले असून किनाऱ्यावर तेलाचा थर साचला आहे.
वसईच्या पश्चिमेच्या भागात अर्नाळा, नवापूर, राजोडी असे विस्तीर्ण समुद्र किनारे लाभले आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून समुद्रात तेलगळतीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना ही त्रास सहन करावा लागत आहे.नुकताच नवापूर, राजोडी व अर्नाळा येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचे तवंग दिसून आहे.
समुद्रातील अंतर्गत भागात होणारे जलप्रदूषण मोठ्या जहाजांमधून पडणारे तेल यामुळे समुद्र जीवांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मागील काही वर्षात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच सागरी प्रदूषणामुळे मत्स्यजीव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. त्यातच तेलाच्या प्रदूषणामुळे होणारी हानी टाळण्यासाठी शासना कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत असे नागरिक मंदार म्हात्रे यांनी सांगितले आहे.
समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या तेल तवंगांची साफसफाई करण्यासाठी येथील प्रशासन उदासन आहे. त्यामुळे सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते श्रमदानातून येथील समुद्रकिनारा स्वच्छ करीत असल्याची माहिती येथील जीव रक्षक जनार्दन मेहेर यांनी दिली आहे.
आरोग्य धोक्यात येण्याची भीती
समुद्र किनाऱ्यावर तेलाचे तवंग येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याशिवाय हा थर वाळू मध्ये पुढचे अनेक दिवस जसेच्या तसे राहतात. इथला किनाऱ्यावर लहान मुलांसह अनेकजण पर्यटनासाठी येत असतात. अशा वेळी किनाऱ्यावर असलेल्या तेल तवंगामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे नागरिकांनी सांगितले आहे.