वसई : वसईतील उमेळमान हद्दीतून रेल्वे मार्गाला छेदणारा रस्ता  रेल्वेकडून बंद करण्यात आला आहे. हा मार्ग बंद झाल्याने  दहा ते बारा गावच्या ग्रामस्थांना शेतीवाडीच्या ठिकाणी  जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जवळपास दीडशेहून अधिक वर्षे जुना मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसईतील उमेळमान, बऱ्हामपूर, राजावळी, टिवरी, पाणजू येथील नागरिकांचा  वसई रोड  ते नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या फाटक नंबर ३६ मधून असलेली रहदारी, वहिवाट व शेतीवाडीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. याच  मार्गावरून येथील शेतकरी ये-जा करीत होते. मात्र १३ मार्चपासून पश्चिाम रेल्वेने हा मार्ग बंद केला आहे.  त्यामुळे पश्चिामेकडून पूर्वेकडे शेतावर ये-जा करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.या भागात शेतकऱ्यांची पाचशे एकर भातशेतीची तर अडीचशे एकर मिठागरे आहेत. अजूनही येथील शेतकरी भातशेती व मीठ  पिकवितात. परंतु त्यांचा ये-जा करण्याचा मार्ग रेल्वेने बंद केल्याने या शेतकऱ्यांना आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.  याबाबत शिवसेनेचे पालघर जिल्हा सहसचिव विवेक पाटील यांनी  राज्याचे मुख्यमंत्री, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री, खासदार, लोहमार्ग पोलीस यांना पत्रव्यवहार करत हा रस्ता गावकऱ्यांसाठी मोकळा करण्यात यावा तसेच उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर खासदार राजेंद्र गावित यांनी देखील याविषयी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.  रेल्वेने मात्र याबाबत २००४ साली फाटक बंद केल्याचे खासदार गावित यांच्या पत्राला उत्तर दिले आहे.

पूर्वीचा बैलगाड्याचा मार्ग

दीडशे वर्षांहून अधिक काळापासून येथील गावकऱ्यांना पूर्व-पश्चिाम उमेळमान हद्दीतून रस्ता होता.ब्रिटिश काळात रेल्वे आल्यानंतर या ठिकाणी उमेळमान फाटक क्रमांक ३६ तयार करण्यात आले. २००४ पर्यंत या ठिकाणी फाटकावर गेटमन नियुक्त करण्यात आला होता. या मार्गावरून शेतकरी आपल्या बैलगाड्या, पिण्याच्या पाण्याचे पिंप तसेच शेती उपयोगी सामान ने आण करीत असत. मात्र २००४ नंतर हे फाटक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले.त्यानंतरही गावकरी या मार्गाचा जवळचा मार्ग म्हणून पायी वापर करीत होते. मात्र १३ मार्च २०२१ दोन्ही बाजूने बॅरिगेट लावून बंद करण्यात आला आहे.