२६ लाख रुपयांहून अधिक ऐवजाचा अपहार

विरार : वसई पोलीस ठाण्याच्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क पोलीस ठाण्यात ठेवलेल्या विविध गुन्ह्यत जप्त केलेल्या मुद्देमालावर डल्ला मारत तब्बल २६ लाख रुपयांहून अधिकचा अपहार केला आहे. या प्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पोलिसाला अटक केली आहे.

पोलिसांनी चोरी केलेली ही पहिली घटना नसून या अगोदरही पोलिसांनी कोटय़वधी रुपयाचे अपहार केले आहेत. वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी मंगल गायकवाड हिने आपल्या साथीदार मुश्ताक खान याच्या मदतीने पोलिसांनी गुन्ह्यत जप्त केलेल्या वाहनांचे भाग लोखंडी साहित्य असे ५० हजार रुपये, जुगारातील गुन्हात जप्त केलेले २ लाख ८२ हजार ७९०, तसेच इतर गुन्ह्यतील ४ लाख ८३ हजार ७७२ तर इतर गुन्ह्यतील ७ लाख ६६ हजार ८६२ पैसे बँकेत भरल्याचे दाखवून अपहार केला.

भंगारमधील वाहने, गुन्हातील दागिने, विदेशी कंपन्यांची दारू, सिगारेट, ड्रायफ्रूट, फ्रीज, वाशिंग मशीन, वातानुकूलित यंत्र, इन्व्हेटर, मोबाइल असा तब्बल २६ लाख ४ हजार ३३६ रुपयांचा माल या महिला पोलीस कर्मचाऱ्याने लंपास केला. २०१७ पासून ही महिला पोलीस कर्मचारी आपल्या साथीदाराच्या मदतीने या मुद्देमालावर डल्ला मारत आहे.

सदरच्या प्रकरणांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत चालली आहे. गुन्ह्य़ात जप्त केलेली रोकड, वाहने, मोबाइल, आणि इतर मुद्देमाल हा पोलिसांना सुरक्षित ठेवने गरजेचे आहे. पण ज्यांच्या  खांद्यावर सुरक्षतेची मदार आहे. तेच या मालावर हात साफ करत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पूर्वीही गुन्ह्यंची नोंद

हे पहिलेच प्रकरण नसून या अगोदर मागील वर्षी वालीव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन कोटीच्या विदेशी सिगारेट विकल्या होत्या. त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याच पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईत जप्त केलेला २ कोटी १६ लाखांचा गुटखा विकल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. तर नालासोपारा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने जप्त केलेला गुटखा पोलिसांसाठी काम करणाऱ्या एका इसमाने १५ लाखांचा गुटखा विकला होता.