वसई : गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक असताना वसईची बाजारपेठ रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने, मखरांनी सजली आहे. तर दुसरीकडे सतत कोसळत असलेल्या पाऊस, निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे खरेदीसाठी नागरिकांना घराच्या बाहेर ही पडता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे आठवडाभर आधीच वसईतील बाजारपेठा रंगीबेरंगी कृत्रिम फुलांच्या माळा, मणी, कापड, हिरे, गोंडे अशा विविध साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या माळा, तोरणं, थर्माकोल आणि विविध साहित्यापासून तयार करण्यत आलेले मखर, कृत्रिम दिवे, विद्युत रोषणाई अशा विविध सजवटीच्या साहित्याने सजल्या आहेत. मात्र, गेले दोन ते तीन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे या बाजारपेठांमध्ये अगदीच शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

वसईत मंगळवारी पडलेल्या पावसामुळे वसई स्थानक परिसरात पाणी भरले होते. रस्त्यावर साचलेले पाणी दुकानात शिरू नये म्हणून सकाळी १० वाजता उघडलेले दुकान अवघ्या दोन तासातच बंद करावे लागले असल्याची प्रतिक्रिया सजावटीच्या सामानाचे विक्रेते पंकज शाह यांनी दिली. तर दुसरीकडे मिठाईच्या दुकानातही पाणी शिरल्यामुळे कच्चा मालाचे तर काही प्रमाणात तयार मिठाईचे नुकसान झाल्याचे मिठाई विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरवर्षी गणपतीच्या आठवडाभर १५ दिवस आधीच लोक आमच्यकडून धूप, अगरबत्ती, तसेच विविध पूजेच्या साहित्याची खरेदी करतात. तर गणपतीसाठी गावी जाणाऱ्या लोकांचीही दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पण यंदा म्हणावी तितकी गर्दी नसल्याची प्रतिक्रिया वामन जाधव यांनी दिली. तर, पावसाने जरी उसंत घेतली असली तरी, अजूनही शहरात वाहतूक सेवा विस्कळीत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे बाजारातील सगळीच खरेदीची दुकानं काही उघडलेली नाहीत. तसेच एकाच दुकानात हवं तसं सामानही मिळत नसल्यचे मत खरेदीदारांकडून व्यक्त केले जात आहे.