वसई: १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांवर उच्च सुरक्षा पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी सातत्याने मुदत वाढ देऊनही पालघर जिल्ह्यातून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत केवळ ३० टक्के वाहनधारकांनी पाट्या बसवून घेतल्या आहेत.

वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना एचएसआरपी अर्थात उच्च सुरक्षा पाटी बसविणे बंधनकारक आहे. असे असले तरी वाहनधारक ही पाटी बसविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात एकूण  ८ लाख ७५ हजार ६९४ इतकी वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे आहे. यात ४ लाख ५० हजार ६३० वाहने एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केली आहेत. या वाहनांच्या पाट्या बसवून घेण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. आता १५ ऑगस्ट ही अंतिम मुदत वाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. मुदत वाढ देऊनही वाहन धारक हे पाट्या बसवून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

आतापर्यंत पालघर जिल्ह्यातील परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या केंद्रावर १ लाख ३१ हजार ५४२ इतक्या वाहनधारकांक उच्च सुरक्षा पाट्या बसविल्या असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३० टक्केच वाहनधारकांनी या पाट्या बसवून घेतल्या असल्याचे समोर आले आहे.

मुदत संपण्यासाठी आता चार दिवस उरले आहेत. असे असतानाही वाहनधारकांकडून मिळणारा प्रतिसाद हा अल्प असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

परिवहन विभागातील कामे रखडणार

वाहनधारक पाट्या बसवून घेत नसल्याने वाहनधारकांची परिवहन विभागाच्या निगडित असलेली कामे न करण्याचा निर्णय घेतला होता. वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (आरसी) पत्ता बदल करणे, वाहनावरील वित्त बोजा चढवणे वा उतरवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, ना हरकत प्रमाणपत्र जारी कारणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी कामे केली जात नाहीत.ज्यांनी पाट्यां बसविल्या आहेत किंवा त्यासाठी अर्ज सादर केले आहेत त्यांची खात्री करूनच कामे केली जात आहेत असे परिवहन विभागाने सांगितले आहे.