भाईंदर : गणरायाच्या विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी भाईंदर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पूर्व-पश्चिम परिसरात वाहनबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा घरगुती तसेच सार्वजनिक अशा मिळून वीस हजाराहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनानंतर पाच दिवस, गौरी-गणपती आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी गर्दी करणार आहेत. या प्रसंगी अनेक भक्तजन ढोल-ताशांच्या गजरात, नाचत-गाजत गणरायाचे विसर्जन करतात. अशा वेळी रस्त्यावर मोठी गर्दी दिसून येते.

भाईंदर भागात जुनी दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्रतेने जाणवते. त्यामुळे यंदा गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व रस्ते मोकळे ठेवण्यासाठी पोलिसांनी भाईंदर पूर्व व पश्चिम परिसरात विसर्जनावेळी वाहनबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी प्रामुख्याने विसर्जनावेळी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत लागू राहणार आहे. यापूर्वी केवळ अनंत चतुर्थीच्या दिवशीच ही वाहनबंदी लागू केली जात होती. मात्र यंदा ती सर्व विसर्जनावेळी लागू असणार आहे. बंदीच्या कालावधीत केवळ विसर्जन वाहन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा आणि गरजू वाहनांनाच परवानगी असेल. इतर नागरिकांना पायी प्रवास करावा लागणार आहे.

या मार्गांवर वाहनबंदी लागू राहणार :

भाईंदर पूर्व – रेल्वे स्थानकापासून फाटक रोड, बी. पी. रोड, जेसल पार्क रोड आणि नवघर रोड.भाईंदर पश्चिम – रेल्वे स्थानकापासून खाडी कडे जाणारा मार्ग, तसेच कोंबडी गल्ली, चाणक्य हॉटेल नाका, बॉम्बे मार्केट आणि साठ फूट रोड.

या दिवशी ५ नंतर असणार बंदी

३१ ऑगस्ट :- पाच दिवसाच्या गणरायांचे विसर्जन

२ सप्टेंबर :- गौरी गणपती

६ सप्टेंबर :- अनंत चतुर्थी