वसई : प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीला चाप लावण्यासाठी आता शहरात मीटर रिक्षा सुरू करण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा सुरू होणार आहेत तसे आदेश ही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चारही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक रिक्षाने प्रवास करतात. गेल्या काही काळात वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रिक्षांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर रिक्षाचे परवाने खुले झाल्यापासून रिक्षाचालकांच्या संख्येत अजून भर पडली आहे. पण याचबरोबर रिक्षाचालकांकडून केल्या जाणाऱ्या मुजोरीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर काही रिक्षा चालक हे बेकायदेशीर पणे रिक्षा चालवित असल्याचे प्रकार घडत आहे.
मुख्य रस्ते, रेल्वे स्थानक परिसर, रहदारीची सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जातात त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. याशिवाय अतिरिक्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहे. प्रशासनाच्या नियमानुसार ३ प्रवासी आणि १ रिक्षाचालक असे एकूण चार व्यक्ती रिक्षातून प्रवास करू शकतात. मात्र रिक्षामध्ये ३ ऐवजी ४ ते ५ प्रवासी भरले जात असतात. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. तर दुसरीकडे अपघात होण्याचा ही धोका निर्माण झाला आहे.
यासाठी वसई विरार मध्ये मीटर रिक्षा सुरू करण्यात यावी अशी मागणी पुढे आली होती. याबाबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी पाठपुरावा सुरू केला होता. सोमवारी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी आमदार स्नेहा दुबे-पंडित, महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी,अतिरिक्त परिवहन अधिकारी भरत कळसकर, एमएसआरटीसीचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी सोनाली सोनार, पोलीस उपायुक्त अशोक वीरकर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.यावेळी वसई विरार शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ नोव्हेंबर पासून मीटर रिक्षा सुरू करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मीटर रिक्षा सुरू होणार असल्याने रिक्षाचालकांच्या सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे.
शेअरिंग रिक्षा ही सुरू राहतील
मीटर प्रमाणे भाडे देणे सर्वच प्रवाशांना परवडणारे नाही यासाठी एकाच ठिकाणी जाणारे तीन प्रवासी एकत्र बसून ते शेअरिंगने जाऊ शकतात असेही परिवहन विभागाने सांगितले आहे.
असे असतील दर
मीटर रिक्षा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दीड किलोमीटर प्रवासासाठी २६ रुपये तर मध्यरात्री २९ रुपये, ४.१० किलोमीटर साठी ७० रुपये तर मध्यरात्री ८८ रुपये, ६.७० किलोमीटर पर्यँतच्या प्रवसासाठी ११५ रुपये तर मध्यरात्री १४४ रुपये इतके पैसे मोजावे लागणार आहेत.
नियोजन करणे आवश्यक
मीटरद्वारे रिक्षा प्रवास सुरू करणाऱ्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आहोत. मात्र याची अंमलबजावणी करताना रिक्षा चालकांच्या संघटनांना विश्वास घेणे आवश्यक आहे असे ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना महासंघाचे अध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले आहे. ज्या दिवशीपासून ही सेवा सुरू होईल कोणत्या मार्गावर मीटर तर कोणत्या मार्गावर शेअरिंग असेल त्याचेही मार्ग ठरवावे लागतील तसेच प्रवासी वर्गात ही याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. असे महासंघाचे विजय खेतले यांनी सांगितले आहे.