Dahisar Toll Plaza / वसई : मुंबईच्या वेशीवर असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दहीसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता.

त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (८ नोव्हेंबर) दहिसर टोलनाक्यासाठी पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण अधिकारी (NHAI), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकारी (MSRDC) आणि मिरा भाईंदर महापालिका आयुक्त (MBMC) आणि काही संबंधित अधिकाऱ्यांसह वसईच्या ससूनवघर येथे दाखल झाले होते. पण, वसईतील ग्रामस्थांनी केलेला तीव्र विरोध आणि घोषणाबाजीमुळे पाहणी न करताच सरनाईकांना माघारी परतावं लागलं.

वसईत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले कि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या विनंतीवरून हा टोलनाका हटवण्याचे निर्देश दिले होते. राज्याचा एक जबाबदार मंत्री म्हणून टोलनाका स्थलांतरित करायचा हा निर्णय मी घेतला.

पण, आता टोलनाका कुठे असावा ही त्या ठेकेदाराची आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरनाईकांच्या या विधानामुळे दहिसर टोलनाका स्थलांतरणबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्वच ठिकाणी राजकारण हे येतंच. दहिसर टोल नाका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी स्थलांतरित करून टाकला तर ते श्रेय आम्हाला मिळेल म्हणून असे उपद्व्याप कुणीतरी करत असतील. परंतु मी राज्याचा मंत्री आहे. मी काही फक्त मिरा भाईंदरचा मंत्री नाही. म्हणून वसईतील ग्रामस्थांचा प्रश्न हे सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचे प्रश्न काही चुकीचे नाहीत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहिसर टोलनाका स्थलांतरित करणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

टोलनाका स्थलांतरणाची जागा अनिश्चितच

गेल्या अनेक महिन्यांपासून दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरणाचा मुद्दा गाजत आहे. पण, हा टोल नाका नेमका कुठे स्थलांतरित केला जावा यासाठी जागाच निश्चित नसल्यामुळे १३ नोव्हेंबरला तरी टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार की नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.