भाईंदर : भाईंदरच्या बीपी रोड येथील श्याम भवन या इमारतीला लागून असलेले हनुमान मंदिर पाडणार असल्याच्या अफवेने शहरातील वातावरण पेटले आहे. या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम आमदार नरेंद्र मेहता यांच्या बंधू करत आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वादात उडी घेत मेहता यांच्यावर आरोप केले आहेत. शुक्रवारी मेहता यांनी पत्रकार परिषद घेत मंदिर पाडणार ही अफवा असून या मागची वस्तुस्थिती मांडली. या मंदिराच्या वादामुळे पुन्हा एकदा मेहता आणि सरनाईक हे आमने-सामने आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाईंदर पूर्वेच्या बीपी रोडवर श्याम भवन ही जुनी इमारत आहे. या इमारतीला लागून हनुमान मंदिर आहे. श्याम भवन ही इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली होती. त्यामुळे इमारत पाडून त्याचे पुर्ननिर्माण करण्याचे काम सुरू आहे. आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावाच्या कंपनीमार्फत इमारत उभारणीचे काम सुरू आहे. या हनुमान मंदिराचे देखील नव्याने बांधून दिले जाणार आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे.

बजरंग दलाकडून रोज हनुमान चालिसा

विकासक जागा बळकावण्यासाठी मंदिर जमीनदोस्त करणार असल्याचा दावा बजरंग दल या संघटनेने केला आणि दररोज हनुमान चालिसा पाठ सुरू करण्यात आला आहे. या इमारतीच्या पुनर्निमाणाचे काम आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधू करत असल्याने त्याला राजकीय वळण लागले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वादात उडी घेतली. त्यांनी हनुमान चालिसात भाग घेतला आणि मेहतांवर आरोप केले होते.

मंदिराच्या आड राजकारण- नरेंद्र मेहता यांचा आरोप

शुक्रवारी आमदार नरेंद्र मेहता यांनी या मंदिराच्या जागेवर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. मंदिर ही खासगी मालमत्ता होती. मधुसूदन शर्मा यांच्या मालकिचे ते मंदिर होते. मंदिरा तोडणार ही अफवा काही लोकांनी पसरवली. निवडणुकीपूर्वी त्यांना राजकीय वातावरण पेटवायचे आहे, असा आरोप मेहता यांनी केला. इमारत धोकादायक होती म्हणून ती पाडण्यापूर्वी वीज जोडणी तोडण्यात आली असेही ते म्हणाले. शहरातील बहुतांश मंदिराच्या उभारणीत आमच्या कुटुंबियांचे योगदान आहे, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.