भाईंदर:-मिरा भाईंदर शहरात एकूण १६२ कुपोषित बालके आहे.यामध्ये ९ बालके तीव्र कुपोषित तर १५३ ही मध्यम कुपोषित श्रेणीत येतात. विशेष म्हणजे, या बालकांवर कोणतेही उपचार सुरू नसल्याची धक्कादायक माहिती महापालिकेत झालेल्या आदिवासी विकास आढावा समितीच्या बैठकीत समोर आली आहे.
मिरा भाईंदर शहरात ग्रामीण पट्ट्यात ८३ अंगणवाड्या आहेत. यात जवळपास ९ हजाराहून अधिक बालके आहेत. यामध्ये सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना व स्तनदा मातांना एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सकस आहार पुरवठा केला जातो. दर महिन्याला अंगणवाड्यांमार्फत ० ते ६ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करून कुपोषणाच्या स्थितीचे वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये ‘मध्यम कुपोषित’ आणि ‘तीव्र कुपोषित’ अशी श्रेणी केली जाते.
सोमवारी महापालिकेत आदिवासी विकास आढावा समितीची बैठक पार पडली. यावेळीआदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित उपस्थित होते. या बैठकीत सद्यस्थितीत मिरा भाईंदर शहरात १६२ कुपोषित बालके असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ९ (सॅम) तीव्र कुपोषित तर १५३ ( मॅम) मध्यम कुपोषित बालके असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.
यावर आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी, तीव्र कुपोषित बालकांवर कुठे उपचार सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर जाधव यांनी सर्व बालके घरीच असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात, तीव्र कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्यक असते. मात्र ही प्रक्रिया न झाल्यामुळे या बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, या बाबतीत पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जानेवारीपासून केंद्र रिकामेच
मिरा भाईंदर शहरातील कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात ‘कुपोषित बाल संगोपन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. मात्र केंद्राची स्थापना होऊन सहा महिने उलटले तरी एकाही बालकावर येथे उपचार करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे कुपोषित बालकांच्या प्रश्नाकडे प्रशासन गंभीरतेने पाहात नसल्याचे आरोप होत आहेत.
महापालिकेला जबाबदारी
मिरा भाईंदर शहरात कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कुपोषित बालकांवर उपचार व काळजी घेण्याची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेने घ्यावी, अशा सूचना आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिल्या. तसेच यासंदर्भात महापालिकेशी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश पंडित यांनी आदिवासी विभाग अधिकारी व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.
अधिकाऱ्यावर प्रचंड नाराजी
मिरा महानगरपालिका मुख्यालयात आदिवासी नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, अप्पर तहसीलदार, शिधा वाटप अधिकारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी शहरातील आदिवासी वस्तीतील कुपोषित बालकांची संख्या किती आहे, असा प्रश्न पंडित यांनी प्रकल्प अधिकारी गणेश जाधव यांना विचारला. मात्र आदिवासी बालकांची स्वतंत्र यादी अद्याप तयार करण्यात आलेली नाही, असे उत्तर जाधव यांनी दिले. त्यावर पंडित यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.