आठवडय़ाअखेर सागरी किनाऱ्यावर पर्यटकांची धाव; पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची भीती

विरार : वसई-विरार परिसरात संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि धीम्यागतीने वाढती रुग्णसंख्या यामुळे १९ ऑगस्टपर्यंत पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू केले आहेत. पण असे असतानाही आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात सागरी किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी उसळत आहे. यामुळे पुन्हा करोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

मागील आठवडय़ापासून शहरात पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी पाहायला मिळाली आहे. त्यात शहरातील नियम शिथिल केल्याने नागरिकांचा वावर वाढला आहे. यामुळे सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताच पालिकेकडून नागरिकांना नियम शिथिल करून दिलासा देण्यात आला. पण यात पर्यटनस्थळे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, समारंभ यावर अजूनही निर्बध असतानाही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. याचा परिमाण शहरात रुग्ण वाढताना दिसत आहेत. यामुळे पुन्हा प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

वसई-विरारला अर्नाळा, राजवडी, कळम, भुईगाव, पाचूबंदर याठिकाणी सागरी किनाऱ्यावर शनिवार, रविवार मनाई आदेश असतानाही हजारो पर्यटक येत आहेत. यामुळे मोठय़ा प्रमाणावर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिसांनी सागरी किनाऱ्याकडे जाणारे रस्ते बंद केले असले तरी लोक आडमार्गाने परिवारासोबत सागरी किनाऱ्यावर पोहचत आहेत. त्यात मुंबई, ठाणे, आणि इतर उपनगरातील पर्यटकांचा सुद्धा समावेश आहे. याठिकाणी असलेले रिसोर्ट बंद असतानाही काही रिसोर्ट नागरिकांना गुपचूप प्रवेश देत आहेत. सुट्टीच्या दिवशी अनेक रिसोर्ट आणि हॉटेलमध्ये पर्यटकांची गर्दी आढळून आली आहे. मुंबई आणि उपनगरातून पर्यटक आल्याने करोना संसर्गाची भीती वाढली आहे. यावर पोलीस गस्त घालून सागरी किनाऱ्यावर जाणाऱ्यांना मज्जाव करत आहेत. पण तरीसुद्धा पोलिसांच्या नजरा चुकवून आलेल्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी १०७ पर्यटकांवर अर्नाळा सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचबरोबर सागरी किनाऱ्यावरील गस्त पोलिसांनी वाढवली आहे.

अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेटय़े यांनी माहिती दिली की, प्रशासनाकडून १९ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी किनाऱ्यावर येऊ नये, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.