भाईंदर: दिवाळीच्या तोंडावर  मिरारोड पोलीस ठाण्यासमोरच अर्धा रस्ता अडवून जुन्या चारचाकी वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे इतर वाहनांना मार्ग मिळत नसल्याने या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

मिरा रोड येथील कनकिया परिसरात रस्ता अडवून जुनी चारचाकी वाहने विक्रीसाठी ठेवणाऱ्या अनेक दुकानांची उभारणी करण्यात आली आहे. हे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वाहने थेट रस्त्यावर उभी करून ठेवतात. सध्या दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे या व्यावसायिकांनी वाहनांची संख्या वाढवली असून, ती सर्व वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आली आहेत. परिणामी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा तयार झाल्या आहेत. उर्वरित थोड्याशा जागेतूनच वाहतूक सुरू असल्याने रहदारीवर गंभीर परिणाम झाला आहे.

हा रस्ता शहरातील अत्यंत रहदारीच्या मार्गांपैकी एक असून, याच मार्गावरून महापालिकेची परिवहन सेवा तसेच अन्य वाहनांचा नियमित प्रवास होतो. मात्र वाहन विक्रेत्यांनी रस्ता अडवल्याने मागील काही दिवसांपासून येथे तीव्र वाहतूक कोंडी होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, काही शोरूम मिरारोड पोलीस ठाण्याच्या समोरच उभारण्यात आले आहेत. परिणामी पोलीस ठाण्याबाहेरदेखील वाहतूक कोंडी होत असताना देखील पोलिसांकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी रस्ता अडवल्याच्या कारणावरून प्रवासी दीपाली मिश्रा यांचे वाहन विक्रेत्यांशी वाद झाला होता. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तरी देखील  रस्ते अडवून वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

गॅरेज चालकांचा देखील त्रास

मिरा-भाईंदर शहरातील अनेक भागांत अनधिकृत गॅरेज रस्त्यावर थाटल्याचे दिसून येतात. हे गॅरेज चालक रस्ता अडवूनच वाहनांची दुरुस्ती करतात, ज्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेष धोरण तयार केले असून, वाहतूक पोलिसांनाही वेळोवेळी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन्ही प्रशासनांकडून ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे समस्या अधिक जटील होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

” प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत शहरातील रस्ते व पदपथ  मोकळे ठेवण्यासाठी कारवाई केली जात आहे. त्यानुसार आलेल्या तक्रारी वर देखील लवकरच कारवाई केली जाईल. “- नरेंद्र चव्हाण – अतिक्रमण विभाग प्रमुख