वसई: घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतुक चिंचोटी भिवंडी मार्गावर वळविली असल्याने त्याचा परिणाम महामार्गासह चिंचोटी – भिवंडी मार्गावर दिसून येत आहे. जवळपास ९० टक्के जड-अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याने वाहनांची मोठी कोंडी होऊ लागली आहे.

मुंबई, पालघर, ठाणे तसेच गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी त्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी २६ते २९ एप्रिल दरम्यान दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केले आहे. ठाण्याच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही चिंचोटी भिवंडी या मार्गावरून वळविली आहेत.

विशेषतः ठाण्याच्या दिशेने मालवाहतूक करणारी मोठ्या संख्येने वाहने आहेत. आता ही सर्व वाहने थेट चिंचोटी- कामण – भिवंडी मार्गे सोडली जात आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

इतर दिवशीच्या वाहतूक होणाऱ्या वाहनांच्या तुलनेत जवळपास चिंचोटी ते भिवंडी मार्गावर ९० टक्के इतका वाहनांची वर्दळ वाढली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका कामण चिंचोटी भागात राहणाऱ्या नागरिकांना बसू लागला आहे. विशेषतः स्थानिक रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे दैनंदिन कामासाठी बाहेर पडणे ही कठीण होऊन बसले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहतूक नियोजन केले जात आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे.चिंचोटी मार्गावरूनच वाहने पुढे न जाऊ देता थेट या मार्गावर वळविली जातात. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत असे चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराब रस्त्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावला

चिंचोटी- कामण- भिवंडी रस्त्याची धूळधाण झाली आहे. दुरुस्तीचे काम सुरू असले तरीही ते धीम्या गतीने आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेचा फटका नागरिकांसह येथील औद्योगिक क्षेत्राला बसत आहे. या खराब रस्त्यामुळे मालवाहतूक करणारी अवजड वाहने अगदी धीम्या गतीने चालवावी लागतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.