पाणीवितरण व्यवस्थेचा कायापालट !

करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.

आराखडय़ाचे काम हाती; ‘सूर्या’, ‘खोलसापाडा’चे २७० दशलक्ष लिटर्स पाणी वसई-विरारमध्ये आणणार

वसई: करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेने रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. सूर्या प्रकल्पाचे अतिरिक्त २०० दशलक्ष आणि खोलसापाडा धरणाचे ७० दशलक्ष लिटर्स पाणी शहरात आणण्यासाठी शहरात वितरण व्यवस्था तयार करण्यात येत आहे. शहरात असलेली वितरण व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या पाच महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

सध्या शहराला सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून २३० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत आहे. शहराची लोकसंख्या २५ लाख आहे. येत्या दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गरज लागणार आहे. त्या दृष्टीने खोसलापाडा धरणाची योजना तयार करण्यात आली होती.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यातून शहराला ७० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. याशिवाय एमएएमआरडीए (मुंबई महानगर विकास प्राधिकरण) तर्फे शहराला सूर्या प्रकल्पातून २०० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर करोनासंकटामुळे काम थंडावले होते. पालिकेची यंत्रणा करोना निवारण्याच्या कामात व्यस्त होती. मात्र आता या योजनेच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू केल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. या योजना पूर्ण होऊन त्याचे पाणी शहरात आणण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. हे पाणी शहरात आणण्यासाठी नव्याने वितरण व्यवस्था तयार करावी लागणार आहे. त्यासाठी आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना वसई विरार महापालिकेचे शहर अभियंता जी.एम. गिरगावकर यांनी सांगितले की, सध्याच्या लोकसंख्येला सुमारे ३२६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. सध्या २३० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असल्याने सुमारे ९६ दशलक्ष पाण्याची तूट भेडसावत आहे. खोसलापाडा आणि एमएमआरडीएच्या योजनांचे पाणी आल्यानंतर पाण्याची गरज भासू शकेल; पण हे पाणी शहरात आले तरी जुन्या वितरण व्यवस्थेमधून ते वितरित करणे शक्य होणार नाही. शहराच्या जलवाहिन्या या जुन्या आहेत. याशिवाय अतिरिक्त पाण्यासाठी जास्त क्षमतेच्या जलवाहिन्या अंथराव्या लागणार आहेत. तसेच पाण्याच्या साठय़ासाठी जलकुंभ उभारावे लागणार आहे. यासाठी शहराच्या रचनेचा नव्याने अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचे काम पुढील ५ ते ६ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात नव्याने वितरण व्यवस्था तयार केली जाणार आहे.

नव्याने पाणी योजनांचे पाणी शहरात आणण्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्याआधी ही वितरण व्यवस्था तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सध्याची जुनी वितरण व्यवस्था अद्ययावत करावी लागणार असून अनेक ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत.

अमृत योजनेला आणखी एक वर्ष विलंब

सर्वाना पाणी मिळावे यासाठी पालिकेने २०१६ मध्ये १३९ कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेचा  उद्देश शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणे हा होता. या योजनेअंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच ३८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश होता. शहरात असलेल्या जुन्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या होत्या. तसेच त्या गंजल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळायचे. या सर्व जलवाहिन्या बदलून नवीन   टाकण्यात येणार होत्या. मात्र ही योजना रखडली होती. मागील चार वर्षांत ठेकेदाराने केवळ ४ जलकुंभ बांधले होते. याशिवाय ३८४ किलोमीटरच्या जलवाहिन्यांपैकी केवळ १८२ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे पाणी असूनही शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिलेले होते. नवीन ठेकेदार बदलून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आता ५ जलकुंभ तयार झाले असून उर्वरित ३ जलकुंभ बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. मात्र अमृत योजनेच्या कामाला आणखी विलंब लागणार आहे. आता हे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन योजनांचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या पाण्याचे सर्व भागांत वितरण करण्यासाठी सध्या असलेली वितरण व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. नवीन जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ बांधावे लागणार आहे. त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे.

जी.एम. गिरगावकर, शहर अभियंता, वसई-विरार महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Transformation water distribution system ssh

ताज्या बातम्या